भात लागवड करताना काय काळजी घ्याल

आपल्या देशातील सुमारे ६५ टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होतो. मानवी शरीरास पोषक अशा बऱ्याच अन्नघटकांचा पुरवठा हा भातातून होत असतो. हलक्या, भारी, पाणथळ, खारवट अशा विविध प्रकारच्या जमिनीत यशस्वीपणे वाढणारे व उत्पन्न देणारे भात हे प्रमुख तृणधान्य पीक आहे. महाराष्ट्र राज्यातील लागवड करण्यात येणाऱ्या अन्नधान्य पिकांचा विचार करता ज्वारी-बाजरीनंतर भात पिकाचा क्रमांक लागतो. असे जरी असले तरी कोकण, विदर्भाचा नागपूर विभाग तसेच कोल्हापूर, पुणे, नासिक, विभागाच्या सह्याद्रीलगतच्या भागातील लोकांचे भात हे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. महाराष्ट्रात भात हे पीक “साळ” आणि “धान” या नावाने देखील ओळखले जाते.

भात पिकाचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने खालील काळजी घ्यावी.

 बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी: 

बियाणे खरेदी करताना परवानाधारक बियाणे विक्रेत्याकडून बियाण्याची खरेदी करावी. तसेच बियाण्याची पिशवी सीलबंद असल्याची खात्री करावी. खरेदी केलेल्या बियांण्याची पावती घ्यावी. खरेदीची पावती, वेष्टन व थोडेसे बियाणे हंगाम संपेपर्यंत जपून ठेवावे. बियाण्यांच्या वैध मुदतीची खात्री करून या मुदतीच्या आतील बियाणे खरेदी करावे. शेतकरी मित्रांनो, वर्षभर पुरून उरणा-या भातपिकाचा हंगाम अवघ्या काही दिवसांत चालू होणार आहे, नव्हे तो एव्हाना चालू झालासुद्धा आहे. 

मशागतीबरोबरच बीजप्रक्रिया करणे आवश्यक असून खरीप हंगामातील भातपिकामध्ये जमिनीतून किंवा बियाण्यापासून होणा-या रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी करून पिकाची निरोगी वाढ होण्यासाठी बीजप्रक्रिया करणे आवश्यक असते

अशी करा बियाण्यास बीजप्रक्रिया:

1684815520016

1) काही शेतकरी अजूनही  पारंपरिक ( स्वतःकडील) बियाण्यांचा वापर शेतीत करतात. अशा शेतक-यांनी 10 लिटर पाण्यात 300 ग्रॅम मीठ विरघळावे आणि द्रावणात बियाणे ओतून ते ढवळावे. तरंगणारे बियाणे बाहेर काढून टाकावे व तळाला राहिलेले बियाणे काढून स्वच्छ पाण्याने धुवावे व सावलीत वाळवावे.(1 दिवस अगोदर) 

2) अशी करा रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया

साधारणपणे 2.5 ग्रॅम कोणतेही एक बुरशीनाशक 1 किलो बियाण्यास पाच मिनिटांपर्यंत घोळवावे. यानंतर प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे.यामुळे कडाकरपा, करपा पिंगट ठिपके यावर नियंत्रण मिळवता येते. पावडर चोळण्यापूर्वी बियाणे थोडे ओले करून घ्यावे. हातात रबरी हातमोजे वापरावेत तसेच तोंडाला मास्क लावावा.

3) जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया

250 ग्रॅम जीवाणू संवर्धनाचे पाकीट (ऍझोटोबॅक्‍टर , PSB) 10किलो बियाण्यास वापरावे. एक लिटर गरम पाण्यात 50 ग्रॅम गूळ टाकून द्रावण तयार करावे. हे द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये 250 ग्रॅम जीवाणू संवर्धन टाकून बियाण्यास हळुवारपणे लावावे. नंतर बियाणे सावलीत सुकवावे व या बियाण्याची पेरणी ताबडतोब करावी. जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यानंतर करावे.

या खरीप हंगामात चांगले पीक हाती येण्यासाठी शेतक-यांनी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. यातून फायदा तुमचाच होणार आहे!

शेतकर्‍यांनी गादीवाफ्यावरील भात रोपवाटिका तयार करावी. 

शेतकर्‍यांनी स्वतःकडील भात बियाण्यास बीजप्रक्रियेसाठी 300 ग्रॅम मीठ प्रति दहा लीटर पाण्यात विरघळून द्रावण तयार करावे. पेरणीपूर्वी बियाणे या द्रावणात ओतावे. नंतर द्रावण ढवळून स्तिर होऊ द्यावे, तरंगणारे पोचट,हलके, कीडग्रस्त, रोगट बियाणे काढून टाकावे. तळाशी राहिलेले वजनदार व निरोगी बियाणे बाहेर काढून ते 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे आणि सावलीत रात्रभर सुकवावे व दुसऱ्या दिवशी पेरणी करावी.  तसेच भाताच्या प्रति किलो बियाण्यास 2.5 ग्रॅम थायरमची बीज प्रक्रिया करावी.तसेच शेतकर्‍यांनी गादीवाफ्यावरील भात रोपवाटिका तयार करतांना तळाशी 120 सें. मी (4 फूट) पृष्ठभागावर 90 सें. मी रुंदी (3 फूट) आणि 8 ते 10 सें. मी उंचीचे आणि उतारानुसार योग्य प्रकारे लांबी ठेऊन शेतकर्‍यांनी गादी वाफे तयार करावेत.

तसेच गादीवाफ्यावर एक गुंठ्यासाठी 100 किलो कुजलेले शेणखत, 1 किलो युरिया, 3 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि साधारण 1 किलो 15:15:15 या रासायनिक खतांच्या मात्रा गादीवाफ्यावर बियाणे पेरणीपूर्वी मातीत मिसळून द्यावे. व नंतर बियाणे पेरणी करावी. गादीवाफ्यावर भात रोपवाटिका केल्यामुळे शेतकर्‍यांची बियाणे बचत होते. निंदनी करणे सोपे जाते, रोपांची वाढ चांगली होते, रोपांची मर होत नाही, जास्त पाऊस झाल्यास सरीतून पाणी निघून जाते, भात रोपे काढण्यास सोपे जाते, लागवडीसाठी भात रोपे लवकर तयार होतात.

अशा प्रकारे भात पीक घेणार्‍या शेतकर्‍यांनी भात बीजप्रक्रिया व गादीवाफ्यावरील भात रोपवाटिका कशा कराव्यात या संदर्भात आपण विडियो पाहू शकता. 

चार सूत्री पद्धत

सूत्र १ – भात पिकाच्या अवशेषांचा फेरवापर.

सूत्र २ –  गिरीपुष्प हिरवळीच्या खताचा मर्यादित वापर.

सूत्र ३ – सुधारित किंवा संकरित जातीच्या भाताची रोपे वापरून चुडांची नियंत्रित लावणी.

सूत्र ४ – नियंत्रित लावणीनंतर ब्रिकेट (युरिया – डीएपी) हाताने ७-१० सें.मी. खोल खोचणे.

सूत्र १ 

भातपिकाच्या अवशेषांतील (तुसाचा व पेंढ्याचा) सिलिकॉन व पालाश या अन्नद्रव्यांचा फेरवापर करावा. 

अ) भाताच्या तुसाची काळी राख रोपवाटिकेत बी पेरण्यापूर्वी मिसळणे

भाताची काळी राख (पूर्ण जळालेली पांढरी राख नव्हे) रोपवाटिकेमध्ये, गादीवाफ्यात भाताचे बी पेरण्यापूर्वी प्रति चौरस मीटर एक किलो या प्रमाणे ४ ते ७ सें.मी. खोलीपर्यंत मातीत मिसळावी. नंतर बिजप्रक्रिया केलेले भाताचे बी त्याच ओळीत पेरावे.

ब) भाताचा पेंढा पुनर्लागवडीपूर्वी शेतात गाडणे 

भाताचा पेंढा पहिल्या नांगरणीच्या वेळी हेक्‍टरी २ टन या प्रमाणात शेतात गाडून घ्यावा.

फायदे –

भातपिकांना सिलिका व पालाश यांचा पुरवठा होतो. पालाश २०-२५ किलो आणि सिलिका १००-१२० किलोपर्यंत उपलब्ध होते. सेंद्रिय पदार्थात वाढ होते.

रोपे निरोगी व कणखर होतात.

 रोपांच्या अंगी खोडकिडा यांना प्रतिकार करण्याची क्षमता वाढते.

 भाताचे उत्पादन वाढण्यास मदत होते.

सूत्र २ 

गिरिपुष्प (ग्लिरिसिडीया) हिरवळीच्या खताचा वापर

गिरिपुष्पाच्या फांद्या जमिनीपासून ३० ते ४० सें.मी. उंचीवर तोडाव्यात. सर्वसाधारणपणे २ ते ४ गिरिपुष्पाच्या झाडांची हिरवी पाने (अंदाजे ३० किलोग्रॅम) प्रति आर पुरेसे होते. त्याच झाडाच्या तोडलेल्या फांद्या चिखलणीपूर्वी ६ ते ८ दिवस अगोदर खाचरात पसराव्यात. आठवड्यात फांद्यांवरील पाने गळून पडतात. उरलेल्या फांद्या गोळा करून जळणासाठी इंधन म्हणून वापराव्यात. चिखलणी करून गळून पडलेली पाने चिखलात चांगल्या रीतीने मिसळून घ्यावीत.

फायदे –

यामुळे भातरोपांना सेंद्रिय – नत्र (हेक्‍टरी १० ते १५ किलोग्रॅम) वेळेवर मिळते. 

खाचरात सेंद्रिय पदार्थ मिसळले गेल्याने जमिनीची जडणघडण सुधारून उत्पादन क्षमता वाढते. 

सेंद्रिय पदार्थ मर्यादित प्रमाणात गाडले जातात. पर्यायाने भात खाचरांतून निर्माण होणाऱ्या मिथेन वायूचे प्रमाणात (म्हणजेच हवेचे प्रदूषण) घट होते.

गिरिपुष्पाच्या झाडापासून उंदीर लांब पळतात. भातातील त्यांचा प्रादुर्भाव कमी राहण्यास मदत होते.  

सूत्र ३ 

नियंत्रित लावणी 

नियंत्रित लावणी करावयाच्या सुधारित दोरीवर २५ सें.मी. व १५ सें.मी. आलटून-पालटून (२५-१५-२५-१५ सें.मी.) अंतरावर खुणा कराव्यात. सुधारित लावणी दोरीवर १५ सें.मी. अंतरावर असलेल्या (प्रत्येक २ ते ३ रोपे/चूड) प्रथम एक व नंतर दुसरा चूड लावावा. त्यानंतर अंदाजाने १५ सें.मी. पुढे आणखी तिसरा व चौथा चूड लावावा. अशा प्रकारे एका वेळी जोड-ओळ पद्धत वापरून त्याच दोरीत लावणीचे काम पूर्ण करावे. लावणी करताना प्रत्येक चुडात २ ते ३ रोपे लावावीत. संकरित भातासाठी एका ठिकाणी एक रोप लावावे. रोपे सरळ व उथळ (२ ते ४ सें.मी. खोलीवर) लावावीत.

फायदे –

प्रचलित पद्धतीपेक्षा बियाण्यांची ३० टक्के बचत होते. 

ओळीत झालेल्या लागवडीमुळे कापणी सुलभ होते. कापणीवरील मजुरीचा खर्च कमी होतो.

चार रोपांच्या मध्ये ब्रिकेट (खतांच्या गोळ्यांचा) कार्यक्षम वापर करता येतो. 

सूत्र ४ 

युरिया-डीएपी  ब्रिकेटचा वापर


नियंत्रित लावणीनंतर प्रत्येक चार चुडांच्या चौकोनात मधोमध सरासरी २.७ ग्रॅम वजनाची (युरिया – डीएपी) १ ब्रिकेट (खताची गोळी) हाताने ७-१० सें.मी. खोल खोचावी. 

एक गुंठे क्षेत्रामध्ये ६२५ ब्रिकेट (१.७५ किलोग्रॅम) पुरतात.

यातून उपलब्ध होणारी खताची मात्रा (प्रतिहेक्‍टरी) ः ५७ किलोग्रॅम नत्र + २९ किलोग्रॅम स्फुरद.

फायदे –

पाण्याबरोबर नत्र व स्फुरदयुक्त खत वाहून जात नाही. खतामुळे होणारे प्रदूषण टळते. दिलेल्या खतांपैकी ८० टक्‍क्‍यांपर्यंत नत्र भातपिकास उपयोगी पडते.

खतात ४० टक्‍क्‍यांपर्यंत बचत होते. 

ब्रिकेट खोल खोचल्यामुळे अन्नद्रव्ये तणाला मिळत नाहीत. तणाचा त्रास कमी होतो.

भाताचे उत्पादन (दाणे व पेंढा) निश्‍चित वाढते. भात शेती फायद्याची होते.

लावणी भातासाठी नत्र व स्फुरद वापरण्याची ही कार्यक्षम पद्धत आहे.

Leave a Comment

पेरणीपूर्वी बिजप्रक्रिया करण्याचे हे आहेत फायदे ! भरड धान्य (Millets) ही काळाची गरज MAHADBT अंतर्गत अनुदानित बी-बियाणे साठी अर्ज प्रक्रिया सुरू गूळ खाण्याचे फायदे आपणास माहीत आहे का ? आंब्या सोबतच त्यांची कोय ही आहे आपल्या साठी आरोग्यदायी!