सोयाबीन पिकातील किडीं कश्या ओळखाल ?

सोयाबीन हे राज्याचे महत्त्वाचे पीक. प्रतिकूल हवामानामुळे अलीकडील वर्षांत या पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव जाणवत आहे. दर्जेदार व अधिक उत्पादनासाठी सोयाबीन पिकाचे किडींपासून प्रभावी संरक्षण करणे गरजेचे झाले आहे. अलीकडे सोयाबीन लागवड फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यापासून साधारणपणे 5 दशलक्ष टन इतकं उत्पादन मिळत. कमी खर्चात जास्तीतजास्त उत्पादन देणारे नगदी पिक म्हणून सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे. परंतु सोयाबीन वरील विविध किडींमुळे उत्पादनात घट येताना दिसते आहे, सोयाबीन पिकातील विविध किडींची ओळखआपण पाहुयात.

1) स्पोडोप्टेरा लिट्युरा

भारतामध्ये या किडीचा प्रादुर्भाव तंबाखू पिकावर नेहमी व मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे तिला तंबाखूवरील पाने खाणारी अळी असे म्हणतात.

किडीचा पतंग मध्यम आकाराचा असून, पुढचे पंख तपकिरी रंगाचे, त्यावर फिकट पिवळसर चट्टे व रेषा असतात. या पतंग किडीची मादी रात्रीच्या वेळी पानाच्या खालच्या बाजूस शिरेजवळ पुंजक्‍याने अंडी घालते. एक मादी पतंग जवळपास 2100 अंडी तीन ते चार पुंजक्‍यांत घालते. एका पुंजक्‍यात सुमारे 300 ते 600 अंडी असतात.
अंड्यातून दोन ते तीन दिवसांनी अळ्या बाहेर पडतात. लहान अळ्या सुरवातीस समूहाने राहतात, पानाच्या खालचा भाग खरवडून खातात. या अळ्या हिरव्या असून, त्यांचे डोके काळे असते. अंड्यांतून बाहेर पडल्यानंतर अळ्या तीन ते पाच दिवस समूहाने राहतात. मोठ्या झाल्यानंतर (साधारणपणे तिसऱ्या व त्यापुढील अवस्था) विखरून एकएकट्या पाने खातात. पूर्ण वाढलेली अळी गडद तपकिरी किंवा हिरवट पांढरी असते.
मोठ्या अळ्या पानावर मोठे छिद्र पाडून खातात. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असेल तर झाडाची पूर्ण पाने खाऊन फक्त शिराच शिल्लक राहिलेल्या दिसतात. फुले व शेंगा लागल्यानंतर शिरादेखील खातात. अळी पाच वेळा कात टाकून 20 ते 22 दिवसांनी जमिनीमध्ये कोषावस्थेत जाते.
कोष लालसर तपकिरी असतात. कोषावस्था आठ ते दहा दिवसांची असते. किडीचा पूर्ण जीवनक्रम 31 ते 33 दिवसांत पूर्ण होतो. किडीचा पतंग व अळ्या दिवसा सूर्यप्रकाशाच्या वेळी जमिनीमध्ये, पानांखाली लपून राहतात व रात्री बाहेर निघतात. एका वर्षामध्ये या किडीच्या सहा ते आठ पिढ्या तयार होतात.

2) हेलिकोव्हर्पा आर्मिजेरा

ही घाटे अळी असून . अळीचा पतंग मजबूत बांध्याचा, फिकट पिवळा किंवा बदामी रंगाचा असतो. मादी पतंग कोवळ्या पानांवर अंडी घालते. अंडी घुमटाच्या आकाराची पिवळसर असतात. तीन ते चार दिवसांनी अळी बाहेर पडते. पहिल्यांदा ती अंड्याचे कवच खाते, मगच पाने खाते.
पहिल्या अवस्थेतील अळी फिकट हिरवी असते व मोठी अळी हिरवट, फिकट पिवळसर, तपकिरी किंवा काळी असते. अळीच्या शरीरावर दोन्ही कडांना तुटक गर्द करड्या रेषा असतात. अळी सुरवातीला पाने खाते. त्यानंतर कळ्या, फुले व शेंगांना नुकसान पोचविते. मोठ्या शेंगांना अळी गोल छिद्रे पाडून आतील दाणे खाते.
अळीची 20 ते 24 दिवसांत पूर्ण वाढ होऊन जमिनीमध्ये कोषावस्थेत जाते. कोष तपकिरी रंगाचे असतात. नऊ ते 13 दिवसांनी कोषातून पतंग बाहेर पडतो. एक जीवनक्रम 31 ते 35 दिवसांमध्ये पूर्ण होतो.

3) उंट अळी

सोयाबीनवर विविध प्रकारच्या उंट अळ्या आढळतात. 

जेसुनिया प्रजातीचा पतंग आकाराने लहान व त्याचे पुढील पंख मळकट पिवळसर असतात. अळी नाजूक फिकट हिरव्या रंगाची व सडपातळ असते, तिला स्पर्श केल्यास चटकन खाली पडते.

क्रायसोडेक्‍सिस प्रजातीच्या पतंगाचे पुढील पंख तपकिरी- करड्या रंगाचे व त्यावर चमकदार झाक असते. मागील पंख फिकट रंगाचे असतात. अळीचा रंग फिकट हिरवा असून, शरीरावर मध्यभागी निळसर हिरवी रेषा असते व रेषेच्या कडा पांढऱ्या असतात. अळीच्या शरीराच्या दोन्ही बाजूंस फिकट पिवळी रेषा असते. अकाया जनाटा प्रजातीला एरंडीवरील उंट अळी असे म्हणतात. अळी सुरवातीला काळी आणि नंतर तपकिरी लालसर रंगाची असते.
लहान अळ्या पानाचा खालचा हिरवा भाग खरवडून जातात, त्यामुळे पानाचा फक्त वरचा पांढरा पापुद्रा दिसतो. अळी मोठी झाल्यावर पानांना छिद्र पाडून खाते. मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास झाडाची संपूर्ण पाने खाऊन फक्त शिराच शिल्लक ठेवतात. याशिवाय फुले व शेंगासुद्धा खातात.

4) पाने पोखरणारी अळी

पूर्वी भुईमुगावर येणारी ही कीड सध्या महाराष्ट्र व मध्य प्रदेशात सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव करत आहे. पतंग निशाचर असून, रात्री प्रकाशाकडे आकर्षित होतात. मादी पतंग पानावर खालच्या किंवा वरच्या बाजूला अंडी घालते. अंडी चमकदार व पांढरी असतात.
दोन ते चार दिवसांनी अंड्यांतून अळ्या बाहेर पडतात. पूर्ण वाढ झालेली अळी मध्यम आकाराची व पाठीमागे निमुळती होत गेलेली असते. अळीचे शरीर हिरवट किंवा तपकिरी व डोके चमकदार काळ्या रंगाचे असते. सुरवातीला अळी पानाच्या वरच्या बाजूने पान पोखरून आत शिरते. आठवडाभर आत राहून बाहेर निघते व पानावर कप्पा बनवून त्यात राहते. यानंतर आजूबाजूची पाने एकमेकांना जोडून त्यामध्ये राहून उपजीविका करते.
प्रादुर्भावग्रस्त पाने तपकिरी पडतात व आकसून वाळून जातात. यामुळे झाडाची वाढ खुंटते, तसेच झाडाला लहान शेंगा लागतात व शेंगा भरत नाहीत. प्रादुर्भाव जास्त झालेले पीक जळल्यासारखे दिसते. कोषावस्था चार ते सहा दिवसांत पूर्ण होऊन त्यातून पतंग बाहेर पडतो. पूर्ण जीवनक्रम 16 ते 22 दिवसांमध्ये पूर्ण होतो. भुईमूग, सोयाबीन पिकाशिवाय ही कीड बावची तणावर उपजीविका करते.

5) चक्री भुंगा

चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे 35 टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होते. मादी भुंगा पानाचे देठ, खोड यावर दोन खापा करून त्यामध्ये अंडी घालतो. दोन्ही खापांच्या मध्ये खालच्या खापेजवळ तीन छिद्रे करते. मध्यभागाच्या छिद्रामधून आत अंडी घालते. अशा प्रकारे एक मादी एका जागी एक अशी जवळपास 78 अंडी घालते.
अंडी फिकट पिवळसर व लांबट आकाराची असतात. पूर्ण वाढ झालेली अळी पिवळी व गोलाकार असते. अंड्यातून अळी बाहेर निघाल्यानंतर ती पानाचे देठ, खोड पोखरत खाली जमिनीकडे जाते. त्यामुळे खापेचा वरील भाग सुकून नंतर वाळतो.
चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे शेंगा कमी लागतात. त्या पूर्ण भरत नाहीत. पीक काढणीवेळी खापा केलेल्या जागेतून खोड तुटून पडते. त्यामुळेदेखील नुकसान होते. अळी 34 ते 38 दिवसांनी कोषावस्थेत जाते. यापैकी काही अळ्या पुढील पावसाळ्यापर्यंत सुप्तावस्थेत जातात, तर काही अळ्या कोषामध्ये जातात.
कोषातून आठ ते नऊ दिवसांनी प्रौढ भुंगेरे बाहेर पडतात. हे भुंगे अंडी देतात. अंड्यांतून अळ्या निघून पिकास नुकसान करतात. पुढच्या पावसाळ्यापर्यंत त्या सुप्तावस्थेत जातात. अशा प्रकारे चक्री भुंग्यांचे दोन प्रकारचे जीवनक्रम असतात. एका प्रकारामध्ये वर्षभरात एकच जीवनक्रम तर दुसऱ्या प्रकारामध्ये दोन जीवनक्रम पार पडतात. सुप्तावस्था झाडाच्या खोडात राहते. पहिला पाऊस झाल्यानंतर अळीची सुप्तावस्था संपते व ती कोषावस्थेत जाते. कोषातून प्रौढ भुंगा बाहेर येतो व अंडी घालतो.

6) खोड माशी

या किडीमुळे सोयाबीनचे शंभर टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होऊ शकते. सोयाबीनशिवाय मूग, उडीद, तूर, चवळी इत्यादी डाळवर्गीय पिकांवर खोड माशीचा प्रादुर्भाव होतो. प्रौढ माशी आकाराने लहान, चमकदार काळ्या रंगाची असते. मादी माशी पानामध्ये वरच्या बाजूस अंडी घालते.
अंड्यातून दोन ते चार दिवसांनी अळ्या बाहेर पडतात. अळी पिवळी, तोंडाच्या बाजूने टोकदार व मागची बाजू गोलाकार असते. अळी पान पोखरून शिरेपर्यंत पोचून शिरेतून पानाच्या देठामध्ये शिरते. त्यानंतर खोडामध्ये शिरते. अशा प्रकारे अळी आतील भाग खात जमिनीपर्यंत पोचते. झाड मोठे झाल्यावर वरून या किडीचा प्रादुर्भाव जाणवत नाही. फक्त जमिनीजवळ खोडातून प्रौढ माशी निघाल्यास खोडाला छिद्र दिसते, त्यामुळे झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. फुले व शेंगा कमी लागतात.
खोड माशीचा प्रादुर्भाव रोपावस्थेत झाल्यावर पूर्ण झाड वाळून जाते. अळी खोडामध्ये कोषावस्थेत जाते व पाच ते 19 दिवसांनी कोषातून प्रौढ माशी बाहेर पडते. अशा प्रकारे खोड माशीच्या वर्षभरात आठ ते नऊ पिढ्या होतात.

सोयाबीन कीड नियंत्रण उपाय 

किडी कीटकनाशके प्रमाण/१५  लि. पाणी/पंप 
स्पोडोप्टेरा, उंट अळ्या,केसाळ अळी, घाटे अळी बिव्हेरिया बॅसियाना, ४० ग्रॅम, 
  क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २० मि. लि. 
  अझाडिरेक्टिन १५०० पीपीएम २५ मि.लि.
  क्लोरपायरीफॉस २० प्रवाही २० मि.लि.
पाने खाणाऱ्या अळ्या निंबोळी अर्क ५ टक्के 
पाने पोखरणारी/ गुंडाळणारी अळी ट्रायझोफॉस ४० ई.सी १६ मि.लि
चक्री भुंगा (गर्डल बिटल) डायमेथोएट ३० प्रवाही १० मि.लि. 
  लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ५ टक्के प्रवाही ६ मि.लि
खोडमाशी क्लोरपायरीफॉस २० प्रवाही २० मि.लि
  थायामेथोक्झाम २५ टक्के प्रवाही २ ग्रॅम
  फोरेट १० जी १० किलो/हे हे जमिनीतून देण्यासाठी 

Leave a Comment

पेरणीपूर्वी बिजप्रक्रिया करण्याचे हे आहेत फायदे ! भरड धान्य (Millets) ही काळाची गरज MAHADBT अंतर्गत अनुदानित बी-बियाणे साठी अर्ज प्रक्रिया सुरू गूळ खाण्याचे फायदे आपणास माहीत आहे का ? आंब्या सोबतच त्यांची कोय ही आहे आपल्या साठी आरोग्यदायी!