“हरभरा पिकावरील किडींचे व्यवस्थापन”
महाराष्ट्रामध्ये मध्ये रब्बी हंगामामध्ये हरभरा हे पीक महत्त्वाचे कडधान्य वर्गीय पीक आहे, बहुउपयोगीतेमुळे कडधान्य वर्गीय पिकांमध्ये सर्वात जास्त उत्पन्नता असल्याने हरभरा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे पीक म्हणून गणले जाते इतर कडधाण्याच्या तुलनेत हरभऱ्यावर फार कमी कीडी आढळतात कारण हरभरा हे पीक थंड हवामानात घेतले जाते तसेच हरभऱ्याच्या झाडाच्या पानावरील लवा द्वारे आम्लयुक्त स्राव बाहेर पडतो यामध्ये मुख्यतः म्यालिक ऍसिड व ओझ्यालिक ऍसिड असते त्यामुळे किडींच्या वाढीला प्रतिरोध होतो. हरभऱ्यावर प्रमुख किडी मध्ये घाटे अळी व मुळे कुरतडणारी अळी आढळतात शेतकऱ्यांनी या किडीच्या व्यवस्थापनासाठी खालील गोष्टी अवलंबल्या पाहिजेत
” घाटेअळी “
घाटेअळी ही हरभरा पिकाच्या कमी उत्पन्नाच्या अनेक कारणांपैकी एक मुख्य कारण ठरलेले आहे घाटेअळी ही बहूभक्षी कीड असून 200 पेक्षा जास्त वनस्पतीवर आपली उपजीविका करू शकते त्यामुळे आपल्याकडे किडीचा प्रभाव हा खरीप हंगामापासून दिसून येतो अनुकूल हवामान असल्याने घाटे अळी सर्वप्रथम कपाशीनंतर तूर व रब्बी हंगामात हरभऱ्या पिकावर दिसून येते
ओळख व जीवनक्रम :
घाटे आळीचा पतंग फिकट पिवळसर रंगाचा असतो प्रौढ मादी अंडी पानाच्या देठावर तसेच कळ्या व फुलांवर एकेक या प्रमाणे २००-३०० अंडी देते आणि ती गोलाकार हिरवट असतात. ५ ते ७ दिवसानंतर अंड्यातून अळी बाहेर येते अळीची पूर्ण वाढ होण्यासाठी १४ ते १५ दिवसाचा कालावधी लागतो अळीचा रंग हिरवटअसून तिच्या शरीरावर तुटक अशा गर्द करड्या रंगाच्या रेषा असतात पूर्ण वाढ झालेली अळी ३०-५० मिमी लांब असते. कोषावस्थेत एका आठवडा पासून तर महिन्या पर्यंत असते. घाटे आळीची एक पिढी २५ ते ५२ दिवसात पूर्ण होते.
नुकसानीचा प्रकार
ही कीड बहुभक्षीय असून विशेषता पीक फुलोऱ्यात किंवा घाटे अवस्थेत असल्याने नुकसानकारक ठरते लहान अळी सुरुवातीला कोवळी पाने,कळ्या व फुले कुरतडून खातात. घाटे लागल्यानंतर अळ्या घाटे कुरतडून त्यास छिद्र पडून आतील दाणे खातात हे अळी दिवसाला जवळपास १० ते २० घाटे खाऊन नुकसान करू शकते, या अळ्याच्या प्रादुर्भावाने हरभरा पिकाचे ५ ते ४० टक्के पर्यंत नुकसान होऊ शकते
” मुळे कुरतडणारी अळी “
ही कीड बहूभक्षी असून हरभरा सोबतच इतर अनेक पिकांवर आढळते या किडीचे चार अवस्था असून अंडी, अळी, कोष, पतंग असून हे पतंग जमिनीवर अथवा झाडांच्या विविध भागावर पांढऱ्या रंगाची १०००-१५०० पर्यंत गोलाकार अंडी देतात अंडी अवस्था चार ते सात दिवसाची असते. पूर्ण वाढ झालेली अळी ४० मी.मी लांब असते आणि अळी अवस्था १० ते ३० दिवसांपर्यंत असते, कोश्यावस्था जमिनीतच १० ते ३० दिवसापर्यंत पूर्ण होते. प्रौढ पतंग २५ मी.मी लांब असून त्याचे पुढील पंख तपकिरी रंगाचे व मागील पंख पांढरट रंगाचे असतात. समोरील पंखावर करड्या तपकिरी रंगाचे पट्टे असतात अशा प्रकारे अनुकूल हवामानात या किडींची एक पिढी ४-५ आठवडयात पूर्ण होते
नुकसानीचा प्रकार:-
ही कीड मुख्यतः ज्या भागात सेंद्रिय पदार्थ जास्त आहे अशा शेतात प्रादुर्भाव जास्त दिसतो. ही अळी दिवसा लपून राहते आणि रात्री जमिनीलगतची झाडांची देठ किंवा फांद्यांना कुरतडून वेगळे करते आणि मातीत घेऊन जाऊन खाते त्यामुळे लहान रोप किंवा फांद्या शेतात पसरलेले दिसतात या फांद्याच्या खाली ही अळी लपून बसलेली असते
यांत्रिक पद्धतीने कीड व्यवस्थापन
- मोठ्या अळया हाताने वेचून नष्ट कराव्यात.
- घाटेआळीच्या सर्वेक्षणासाठी ५ कामगंध सापळे प्रति हेक्टरी जमिनीपासून १ मीटर उंचीवर लावावेत. कामगंध सापळ्यांमध्ये ८ ते १० पतंग प्रति सापळा सतत दोन ते तीन दिवस आढळल्यास कीटकनाशकाची फवारणी करावी
- पीक १ महिन्याचे झाल्यानंतर पिकापेक्षा १ ते १.५ फूट अधिक उंचीचे इंग्रजीची T अक्षराच्या आकाराचे ५० पक्षी थांबे प्रति हेक्टर घाटेअळी साठी लावावी
जैविक पद्धतीने कीड नियंत्रण
- पिकाच्या सुरुवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अझाडीरॅक्टिन ३०० पीपीएम ५ मिली प्रति लिटर पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी करावी
- बिव्हेरिया ब्यासियाना १ टक्के विद्राव्य ६ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी
रासायनिक पद्धतीने कीड व्यवस्थापन
आर्थिक नुकसान पातळी– पिकात घाटी अळीच्या २ अळ्या प्रति मीटर ओळ किंवा ५ टक्के कीडग्रस्त घाटे किंवा ८-१० पतंग प्रति कामगंध सापळ्यात सतत २ ते ३ दिवस आढळल्यास शिफारशीनुसार कीटकनाशकाची फवारणी करावी
किडी | किटकनाशक | मात्रा /१० लि. पाणी |
घाटे अळी | इमामेक्टीन बेंझोएट ५ एसजी | ४.४ ग्रॅम |
लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ इसी | १० मि.ली | |
फ्लल्यूबॅडामाईड २० डब्ल्यूजी | ५ ग्रॅम | |
क्लोरॅन्रापनलीप्रोल १८.५ एससी | २.५ मि.ली | |
मुळे कुडतरणारी अळी | क्लोरिायपरफॉस २० इसी | २५ मि.ली |
वरील कीटकनाशकाचे प्रमाण हे साध्या पंपासाठी म्हणजेच 15 लिटर पंपासाठी आहे घाटेअळी मुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच जागरूक होऊन वरील प्रमाणे उपाय योजना कराव्यात. शेतात कीटकनाशकाची फवारणी करताना चष्मा, हातमौजे, तोंडावर मास्क चा वापर करावा व दक्षता घ्यावी.