साधारणपणे ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पीक फुटवे येण्याच्या उत्तर अवस्थेत आणि पोटरी अवस्थेत असताना पिकावर बुरशीजन्य पर्ण करपा, खोड करपा, जिवाणूजन्य करपा आणि काही भागात पर्णकोष करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. त्यानंतर पुढील टप्प्यात फुलोरा अवस्थेत वातावरण सतत ढगाळ राहिल्यास तसेच नियमित मध्यम ते तुरळक पाऊस सतत राहिल्यास पिकांवर पर्णकोष कुजवा, आभासमय काजळी आणि लोंबीतील दाणे काळे पडणे या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
बहुतांश संकरीत जातीवर आभासमय काजळी रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.
काही सखल पाणथळ भागामध्ये भातावर जिवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो .
खालील रोगांची लक्षणे ओळखून नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.
करपा (बुरशीजन्य करपा)
सर्व अवस्थांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव होतो.
पानांवर शंखाकृती किंवा डोळ्याच्या आकाराचे करड्या रंगाचे ठिपके आढळतात.
पानांवरील ठिपका मध्यभागी राखाडी रंगाचा आणि कडा तपकिरी असलेला दिसून येतो. असंख्य ठिपके एकत्र मिसळून पान करपते.
रोगाचा प्रादुर्भाव रोपाच्या पेरावर झाल्यास रोगग्रस्त भाग काळा पडून कुजतो, रोप पेरात मोडते.
लोंबीच्या देठाचा भाग काळा पडून कुजतो. लोंबी रोगग्रस्त भागात मोडून लोंबत राहते.
लोंबीतील दाण्यावर रोगाचे तपकिरी काळ्या रंगाचे ठिपके दिसून येतात.
नियंत्रणाचे उपाय –
ट्रायसायक्लॅझोल (७५ टक्के) १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी. १५ दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या घ्याव्यात.
नत्रयुक्त खतांची पुढील मात्रा कमी प्रमाणात द्यावी.
कडा करपा (जिवाणूजन्य करपा)
रोगग्रस्त रोपांची पाने कडेकडून मध्य शिरेच्या दिशेने करपतात. कालांतराने संपूर्ण पान करपते.
सकाळी पानांचे निरीक्षण केले असता पानांच्या खालच्या बाजूला दुधाळ रंगाचे जिवाणूंचे दवबिंदू साचलेले दिसतात.
चुडातील पाने करपून रोपे मरतात. या अवस्थेस क्रेसेक किंवा रोपांची मर असे म्हणतात.
रोगाचा प्रादुर्भाव पीक फुलोऱ्यात असताना झाल्यास दाणे कमी भरतात. पळींजाचे प्रमाण वाढते.
नियंत्रणाचे उपाय –
पावसाची उघडीप बघून कॉपर ऑक्सिक्लोराइड २५ ग्रॅम आणि स्ट्रेप्टोमायसीन सल्फेट * ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी, १५ दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात.
शेतातील जादा पाण्याचा निचरा करावा.
पिकाला नत्रजन्य खतांची पुढील मात्रा कमी प्रमाणात द्यावी.
पर्णकोष करपा
चुडाच्या तळाशी खोडावर तपकिरी रंगाचे अनियमित आकाराचे लांबट ठिपके तयार होतात.
रोगट भागात बुरशी आत शिरून खोड कमकुवत करते. खोडाचा चिवटपणा कमी होऊन रोप कोलमडते.
पीक करपते. लोंबी भरत नाही.
दाटीने वाढलेल्या शेतात रोग मोठ्या प्रमाणात पसरतो.
नियंत्रणाचे उपाय –
प्रोपीकोनॅझोल १० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी.
शेतातील पाण्याचा पूर्णपणे निचरा केल्यानंतर फवारणी करावी.
बुरशीनाशकाची फवारणी चुडातील आतल्या भागातील खोडावर होईल याकडे लक्ष द्यावे.
आभासमय काजळी
भाताचे पीक फुलोऱ्यात असताना ढगाळ व पावसाळी हवामान टिकून राहिल्यास या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. पीक फुलोऱ्यावर येऊन लोंब्या भरून येईपर्यंत प्रादुर्भाव समजत नाही. लोंब्या भरत असताना दाणे न भरता पिवळसर हिरवट मखमलीसारख्या चपट्या गोल गाठी तयार होतात. जुन्या गाठी हिरवट पिंगट, काळपट, फुललेल्या दिसतात. अनुकूल वातावरण या रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो. पाऊस जास्त असल्यास या रोगाचे प्रमाण जास्त असते. भारी जमीन व भरपूर पाणीपुरवठा रोगास अनुकूल ठरतो. टाळण्यासाठी भारी जमिनीत मध्यम गरव्या जाती लावू नयेत. पीक फुलोऱ्यात असताना खाचरात पाणी माफक ठेवावे.
नियंत्रणाचे उपाय:- या रोगाच्या नियंत्रणासाठी तीन टक्के मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया करावी. त्यानंतर थायरम तीन ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे चोळून पेरणी करावी. हलके रोगट बी जाळावे. रोगट लोंब्या नष्ट कराव्यात. या रोगाच्या नियंत्रणासाठी, फुलोऱ्यावेळी फवारणी प्रती लिटर पाणी कॉपर हायड्रॉक्साईड (७७ टक्के) २.६ ग्रॅम.
ऊदबत्ता
प्रथम लागण बियानामार्फत होते हा रोग पावसाळी व थंड हवामानात जास्त बळावतो या रोगामुळे नेहमीसारखी लोंबी बाहेर न पडता राखाडी पांढरट रंगाची सुरसुरी सारखी दाणे विरहित लोंबी बाहेर पडते थोड्याच दिवसांत रोगट लोंब्या काळ्या पडतात आणि उदबत्ती सारख्या दिसतात.
नियंत्रण उपाय :- कानी आणि ऊदबत्ता रोगग्रस्त लोंब्या प्लास्टिक पिशवीत काढून त्याचा नाश करावा जेणे करून हा रोग इतरत्र पसरू नये.