उत्पन्न वाढीसाठी करा नियंत्रित पद्धतीने भात लागवड

आपल्या देशातील सुमारे ६५ टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होतो. मानवी शरीरास पोषक अशा बऱ्याच अन्नघटकांचा पुरवठा हा भातातून होत असतो. तसेच इतर पिकांच्या तुलनेत पशु-पक्ष्यांचे खाद्य व औद्योगिकदृष्ट्या देखील भाताचे अनेक उपयोग होतात. त्यामुळे भात हे बहुगुणी तृणधान्य पीक म्हणून ओळखले जाते. याशिवाय हलक्या, भारी, पाणथळ, खारवट अशा विविध प्रकारच्या जमिनीत यशस्वीपणे वाढणारे व उत्पन्न देणारे भात हे प्रमुख तृणधान्य पीक आहे. महाराष्ट्र राज्यातील लागवड करण्यात येणाऱ्या अन्नधान्य पिकांचा विचार करता ज्वारी-बाजरीनंतर भात पिकाचा क्रमांक लागतो. असे जरी असले तरी कोकण, विदर्भाचा नागपूर विभाग तसेच कोल्हापूर, पुणे, नासिक, विभागाच्या सह्याद्रीलगतच्या भागातील लोकांचे भात हे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. महाराष्ट्रात भात हे पीक “साळ” आणि “धान” या नावाने देखील ओळखले जाते.

हेक्टरी उत्पादकता वाढवण्यासाठी सहाय्यक ठरणाऱ्या विशेषतः सुधारित भात जातींच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ, शिफारशीनुसार सेंद्रिय व रासायनिक खतांच्या मात्रांचा संतुलित वापर, मशागतीचे व लावणीचे योग्य तंत्रज्ञान, पीक संरक्षण उपायांचा अवलंब इत्यादी बाबींवर विशेष भर द्यावा लागणार आहे. तसेच संकरीत भात निर्मितीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. आपल्या राज्यातील खरीप व उन्हाळी हंगामात भाताची लागवड केली जाते.

भाताचे सुधारित, संकरित वाणांचे बियाणे शासकीय यंत्रणेकडून अथवा कृषी विद्यापीठाच्या विक्री केंद्राकडूनच खरेदी करावे. लावणी पद्धतीसाठी 40 किलो प्रति हेक्‍टरी बियाणे वापरावे. संकरित जातींसाठी हेक्‍टरी 20 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 2.5 ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा थायरम बुरशीनाशक चोळावे. त्यानंतर 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर जिवाणू संवर्धक व 250 ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक प्रति 10 किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.

सेंद्रिय खतांची मात्रा हेक्‍टरी 10 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा हिरवळीच्या खताचा वापर करावा. 

रासायनिक खतांची मात्रा – हेक्‍टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश द्यावे. संकरित जातीकरिता हेक्‍टरी 120 किलो नत्र, 50किलो स्फुरद व 50 किलो पालाश द्यावे. यापैकी लागणीच्या वेळी 50 टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश आणि उरलेले 25 टक्के नत्र लागणीनंतर 25 ते 30 दिवसांनी आणि उर्वरित 25 टक्के नत्र लागणीनंतर 55 ते 60 दिवसांनी द्यावे. 

जैविक खतांची मात्रा – 

ऍझोला (चार ते पाच क्विंटल प्रति हेक्‍टर) चिखलणीच्यावेळी शेतात मिसळावे. निळे- हिरवे शैवाल प्रति हेक्‍टरी 20 किलो लागणीनंतर आठ ते 10 दिवसांनी शेतात मिसळावे.


* रोपांना जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया – लागवडीपूर्वी रोपे जिवाणू संवर्धकांच्या द्रावणात बुडवावीत. हे द्रावण तयार करण्यासाठी 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर आणि 250 ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक 10 लिटर पाण्यात मिसळावे. या द्रावणात रोपे 20 मिनिटे बुडवून ठेवावीत. त्यानंतर पुनर्लागवड करावी
 
चारसूत्री पद्धतीने भात लागवड केल्याने रोपांची चांगली वाढ होते. 
पीक व्यवस्थापन करणे सोपे जाते. त्याचबरोबरीने चांगले उत्पादन मिळते. 
भात लागवडीतील चार सूत्रे :


सूत्र 1 –

भाताच्या तुसाची काळी राख रोपवाटिकेत बी पेरण्यापूर्वी मिसळावी. पहिल्या नांगरणीच्या वेळी हेक्‍टरी अंदाजे दोन टन भाताचा पेंढा लावणीपूर्वी शेतात गाडावा. त्यामुळे पालाश 20-25 किलो आणि सिलिका 120 किलो उपलब्ध होते. रोपे कणखर होऊन खोडकिडीला प्रतिकार करण्याची क्षमता वाढते.

सूत्र 2 –

प्रति गुंठा गिरिपुष्प (ग्लिरिसिडीया) झाडाची 30 किलो पाने चिखलणीपूर्वी सात ते आठ दिवस अगोदर पसरावीत. भात रोपांना सेंद्रिय नत्र हेक्‍टरी 10 ते 15 किलो उपलब्ध होते. तसेच उंदरांचा प्रादुर्भाव कमी होतो.


सूत्र – 3 – नियंत्रित लावणी –

– नियंत्रित लावणी करावयाच्या सुधारित दोरीवर 25 सें.मी. व 15 सें.मी. आलटून (-25-15-25-15-सें.मी.) अंतरावर खुणा कराव्यात. सुधारित लावणी दोरीवर 15 सें.मी. अंतरावर असलेल्या (प्रत्येक दोन ते तीन रोपे/चूड) प्रथम एक व नंतर दुसरा चूड लावावा. त्यानंतर अंदाजाने 15 सें.मी. पुढे आणखी तिसरा व चौथा चूड लावावा. अशा प्रकारे एकावेळी जोड-ओळ पद्धत वापरून त्याच दोरीत लावणीचे काम पूर्ण करावे. त्यानंतर मार्गदर्शक वापरून 40 सें.मी. दोरी मागे सरकवावी. पुन्हा जोड-ओळ पद्धत (चार चूड) वापरून खाचरातील नियंत्रित लावणी पूर्ण करावी. खाचरात 15 x 15 सें.मी. चुडांचे चौकोन व 25 सें.मी. चालण्याचे रस्ते तयार होतात. 

– लावणी करताना प्रत्येक चुडात दोन ते तीन रोपे सरळ व उथळ (दोन ते चार सें.मी. खोलीवर) लावावीत. संकरित भातासाठी एका ठिकाणी एक रोप लावावे.

सूत्र 4 – युरिया-डीएपी ब्रिकेटचा वापर –

नियंत्रित लावणीनंतर त्याच दिवशी प्रत्येक चार चुडांच्या चौकोनात मधोमध सरासरी 2.7 ग्रॅम वजनाची (युरिया-डीएपी) एक ब्रिकेट (खताची गोळी) हाताने सात-10 सें.मी. खोल खोचावी. एक गुंठे क्षेत्रासाठी 625 ब्रिकेट (1.75 कि.ग्रॅ.) लागतात.
 

Leave a Comment

पेरणीपूर्वी बिजप्रक्रिया करण्याचे हे आहेत फायदे ! भरड धान्य (Millets) ही काळाची गरज MAHADBT अंतर्गत अनुदानित बी-बियाणे साठी अर्ज प्रक्रिया सुरू गूळ खाण्याचे फायदे आपणास माहीत आहे का ? आंब्या सोबतच त्यांची कोय ही आहे आपल्या साठी आरोग्यदायी!